Translate

Monday, October 29, 2012

Pune's Lavani

पुण्याची लावणी.

आर्यभूषण थिएटर, पुणे

सकाळच्या गाडीनं मी व भूषण पुण्याला गेलो. वैशाली या हॉटेलमध्ये भरपेट खाऊन नंतर ११च्या सुमाराला गणेश पेठ, डुल्या मारुती चौक येथील आर्यभूषण थिएटरमध्ये गेलो. हे थिएटर पुण्यातील जुन्या वस्तीत आहे. त्यामुळे पुणे स्टेशन ते आर्यभूषण थिएटर इतक्या निरनिराळ्या वस्त्यांतील बदल कळले. आर्यभूषणमध्ये शिरल्या शिरल्या लक्षात आले की तिथली जमीन ओली आहे. स्त्री-पुरुष कलाकार उघड्यावरच  अंघोळी आणि कपडे-भांडी धुणी करत होते.

पद्माबाई 

पद्माबाई, ज्येष्ठ तबलजी व त्यांच्या पार्टीतील तबलजी. पुणे २००९.
आर्यभूषणमध्ये आम्ही प्रथम पद्माबाईंकडे गेलो. तेव्हा त्यांची रिहर्सल चालू होती. पद्माबाई व त्यांच्या ग्रुपमधील एक डान्सर यांची त्यांच्या ग्रुपचा ढोलकिया आणि तबलजी यांजबरोबर ही रिहर्सल होती. याशिवाय एक ज्येष्ठ तबलजी बसले होते. त्यांनी पद्माबाईंना गाण्याचे व तबल्याचे बोल लिहून दिले. या आधी मी ज्या लावण्या बघितल्या होत्या त्यांच्या घुंगरांच्या तालात मला काही फरक जाणवला नव्हता किंवा गाण्यामध्ये आणि ढोलकीच्या तालातही काही फरक जाणवला नव्हता. पण पद्माबाईंकडे आलेल्या त्या ज्येष्ठ तबलजींनी (त्यांचे नाव लक्षात नाही) इतर डान्सर्सना शिकवताना मला सुद्धा घुंगरांचे ताल आणि तबल्याचे बोल यांतील ताळमेळ समजून आला. 


पुण्याला जायची माझी पहिलीच वेळ असल्याने मला काही या मुलींशी बोलणे जमले नाही व भूषणच सगळ्यांची बोलत राहिला. गावाकडच्या असल्याने सगळ्या डान्सर्स एकदम अगत्यशील व आग्रही आहेत. प्रत्येक घरात गेलं की नको नको म्हटलं तरी एक चहा, एक ज्यूस प्यावाच लागतो. पहिल्यांदा मी नको म्हणायचे मग लक्षात आले की  इथे जेवण उशिरा २-२:३० वाजता होतं त्यामुळे फोटोग्राफी-गप्पा करता करता हे प्यायला काही वाटत नाही.


मोहनाबाईं कडील जेवण, पुणे २०१०.
पद्माबाईंकडील मुलींचे वय जाणून घेतल्यावर मला धक्काच बसला. कारण १२-१३ वर्षांपासून मुली यायला लागतात. याचे कारण कोणत्या जातीत जन्म घेतला किंवा खूप गरिबी. पद्माबाईंकडील व लावणीतील एक लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे त्यांचे कडील जेवण. माझे पोट खूप नाजूक होतं. तिखट, नॉनव्हेज आणि बाहेरचं जेवण मला कधीही पचत नसे. त्यामुळे मी हे पहिले जेवण घाबरतच घेतले. कसलीतरी पालेभाजी आणि सुंदर मोठ्या चपात्या. त्या भाजीत खूप हिरव्या मिरच्या होत्या. माझ्या घरी हिरव्या भाजीत हिरव्या मिरच्या टाकत नाहीत. जेवण संपल्यावर माझ्या ताटात आधीच्या भाजीच्या ढिगाहून थोडा कमी असा हिरव्या मिरच्यांचा ढीग माझ्या ताटात जमा झाला होता. मी सोडून कोणाच्याही ताटात तो नव्हता. हे जेवण आणि नंतर मोहनाबाईंकडील बाकीची जेवणं खाऊन कळले की जेवण कितीही तिखट असले तरी पोट ही बिघडत नाही व acidity पण होत नाही. जेवण पण मस्त झणझणीत मटणाचे, वगैरे असतं.


पद्माबाई पोझमध्ये, पुणे २०१०
 पद्माबाई, मोहनाबाई व इतर पार्ट्याच्या आर्यभूषणमधील खोल्यांतून फिरताना काही गोष्टी लक्षात येतात त्या म्हणजे छोट्या जागा नि अंधार! फोटोग्राफरच्या दृष्टीकोनातून बघता खूपच अंधार. थिएटर जुन्या पद्धतीचे असल्याने खिडक्या नाहीत. मधोमध स्टेज समोर बाकडी व आजूबाजूला छोट्या खोल्या. जो काही प्रकाश असेल तो दारातून आणि ट्यूबलाईट्समधून मिळतो. ट्यूबलाईट्स दिवसभर चालू ठेवाव्या लागतात.
कोणत्याही खोलीला खिडक्या नाहीत. ज्या खोल्या अंतर्भागात आहेत त्यांना तर दरवाजातून सुद्धा उजेड मिळत नाही. विसेक पार्ट्या तिथे राहतात. खोल्या छोट्या असल्याने काही जणी स्टेजवर झोपतात. मुलींना थिएटरवरच रहावे लागते. महिन्यातून एकदा घरी किंवा बाहेर जाता येतं.


पद्माबाई पोझमध्ये, पुणे २०१०

पद्माबाई पोझमध्ये, पुणे २००९

पद्माबाई पोझमध्ये, पुणे २००९


फोटो नाचाचे काढायचे असल्याने स्लो शटर स्पीड, ट्रायपॉडचा उपयोग नाही आणि तो ठेवायला जागा सुद्धा नाही. मला flash वापरायला आवडत नसूनही ISO वाढवल्याने फोटोची quality खराब होत असल्याने काही वेळा पद्माबाईंकडे  flash चा वापर करायला लागला. मला तेव्हा अंधार्‍या ठिकाणी फोटो कसे काढावे हे माहित नव्हतं व माझ्याकडे low-light लेन्स पण नव्हती. पद्माबाईंचे वय ४५च्या पुढे आहे. त्या इतक्या जोमाने आणि उत्साहाने नाचतात कि आपल्याला थक्क व्हायला होते. सतत हसतमुख असतात.



No comments: