Translate

Thursday, March 10, 2011

Lavani Photography - My Experiences

लावणी

लहानपणी चित्रपटांत लावणी तमाशा सवालजवाब पाहिले होते. चित्रपटातील इतर गोष्टींप्रमाणेच ह्या गोष्टी देखील माझ्या शहरी वातावरणाला अप्राप्य होत्या. पण कुठेतरी मनात अशी इच्छा होती की तमाशा बघायला मिळावा. पुढे मोठेपणी एका ग्रामीण भागात वाढलेल्या मैत्रिणीशी ओळख झाल्यावर मी तिला याबद्दल विचारले. तिचे म्हणणे असे पडले की - गावातल्या तमाशांना स्त्रिया जात नाहीत, फक्त पुरुषच असतात. तेव्हा वाटले की तमाशा आपल्याला काही बघायला मिळायचा नाही.

काही वर्षांनी भूषण या माझ्या मित्राबरोबर - बिन बायकांचा तमाशा - हा लावणी नृत्याचा कार्यक्रम विलेपार्ले इथल्या दीनानाथ सभागृहात बघितला. त्या कार्यक्रमाला आलेला प्रेक्षकवर्ग मुख्यत्वे कामगारवर्ग होता आणि मला वाटल्याप्रमाणे फक्त पुरुष नसून पूर्ण कुटुंब - मुले, आई, आजी, मावशी असा सर्वसमावेशक होता. बिन बायकांचा तमाशा हा कार्यक्रम हा नावाप्रमाणेच अगदीच वेगळा होता. ह्या कार्यक्रमातील सर्व नृत्यांगना ह्या स्त्रिया नसून पुरुष कलाकार आहेत. त्या स्त्रिया नाहीत हे ओळखू ही येत नाही इतक्या त्या नृत्यात प्रविण आहेत . त्या कार्यक्रमाचा अनुभव फारसा सुखद नव्हता. भड़क प्रकाश योजना, कर्कश गाणी आणि प्रेक्षकांतून शिट्ट्या, आरोळ्या असे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर लावणी सभ्य स्त्रियांसाठी नाही हे किती खरे असे मला वाटले.

'नटले तुमच्यासाठी' या डॉक्युमेंटरीकरता छायाचित्रण

मुजरा

या नंतर लगेचच भूषणने  मला फोन केला आणि त्याने मला सांगितले की तो लावणीवर संशोधन आणि माहितीपट (डॉक्युमेंटरी) करतो आहे तर त्याला still photography करून हवी आहे. मी तेव्हा नुकतीच फोटोग्राफी करायला सुरुवात केली होती. त्यामुळे जेव्हा मी 'गुलजार गुलछडी' या लावणी कार्यक्रमाचे फोटो काढण्यास गेले तेव्हा स्टेजवर नाच चालू आहे, आपण प्रेक्षागृहात दुसर्‍या रांगेत इतर प्रेक्षकांसमवेत बसून फोटो काढतोय असे केले नव्हते. पण नैसर्गिक प्रकाशात फोटो काढायची आवड आणि सवय होती. दामोदर हॉल परळ येथे गेल्यावर प्रथम ड्रेसिंगरूममधे जाऊन सर्व कलाकारांच्या ओळखी करून घेतल्या. ड्रेसिंगरूममधे आरशांना दिवे लावले असल्यामुळे कमी प्रकाशात फोटो काढणे सोपे गेले. तरीसुद्धा आरशांनी भरलेल्या खोलीत स्वत:चा फोटो येऊ न देता कलाकारांचे फोटो कसे काढायचे हे स्वत:च शिकायला मिळाले. माझी किट लेन्स (18-55mm) ही जवळून फोटो काढायला असमर्थ होती. तेव्हा अंधारात लेन्स बदलणे, सुरुवातीचे फोटो वाइड अँगलने काढून नंतरची नृत्ये, हावभाव, अदाकारी इत्यादि टेलीफोटो लेन्सने काढणे याचा सराव झाला. रंगमंचावर प्रकाश योजना बदलत असते, स्पॉटलाईटची तीव्रता कमी-जास्त होत असते. लावणी कलाकारांच्या चेहर्‍यावरील प्रकाशही कमीजास्त होतो अशा वेळेला न हललेले फोटो काढणे ही एक कसरतच असते.

माझा कॅमेरा आणि लेन्सेस बजेटमधल्या असल्यामुळे त्यांची कमी प्रकाशात जलदगतीचे फोटो काढायची क्षमता नाही आणि थिएटरमधे कमी प्रकाशातील नृत्यांचे फोटो काढताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.  स्टेजवरील नृत्यांचे फोटो काढता येण्यासाठी ISO वाढवून 800, 1600 करावे लागते. पण असे केल्यास फोटोमध्ये noise वाढून ते खराब दिसण्याची शक्यता वाढते. तसेच दुसर्‍या रांगेत बसूनही वाइड लेन्सने फोटो काढणे शक्य नसते. पण ग्रुप फोटो नीट येतात. टेलिलेन्सने फोटो काढताना Tripodशिवाय काढले कारण तिथे Tripod वापरणे शक्य नव्हते. कधी ड्रेसिंग रूम, कधी विंगेतून, कधी समोर बसून असे फोटो काढले.  
टेलिलेन्सने slow shutterspeed वापरून काढलेले सुरुवातीचे फोटो हलले, पण त्याच ३ तासाच्या शोमध्ये सराव होऊन न हललेले क्लोजप फोटो काढता आले. 

पुणेरी ठसका मुंबईचा हिसका मधील कलाकार 

बॅकस्टेजला शोच्या सुरुवातीला, मध्यंतरात जाण्याने खूप गंमतीदार प्रसंग आले. कुठल्या पेपर करता फोटो काढता हि विचारणा तर सतत होत असते. एका निर्मात्याने मलाच फिल्म दिग्दर्शिका समजून त्यांच्या डान्स पार्टीला फिल्ममध्ये घ्यायची विनंती केली. फोटो काढता काढता इतर कलाकारांबरोबर प्यायलेला कटिंग चहा आणि खाल्लेला वडापाव, माझ्या लाजाळूपणा व अबोलतेवर मात करून मारलेल्या गप्पा. तरीही हे पहिले प्रयत्न मला जमले नाहीत आणि नीटसे फोटोही आले नाहीत. पण जे काही आले ते वेगळेच आले आणि सर्व मित्र मैत्रिणींनी खूप कौतुक केलं.

सिनेस्टार प्रज्ञा जाधव

दुसरा लावणी कार्यक्रम 'पुणेरी ठसका मुंबईचा हिसका' दोनच दिवसांनी दामोदर हॉलमध्येच होता. आणि आता या वातावरणाची सवय झाली होती. दुसर्‍या शोच्या वेळेला डॉक्युमेंटरी चित्रित होणार होती. तेव्हा त्या कॅमेर्‍यामध्ये स्वत:ला येऊ न देता फोटो काढायचे होते. या शोमध्ये आकांक्षा कदम, अनिल हंकारे असे लावणी मधील दिग्गज कलाकार होते. हे सर्व लावणी कलाकार स्वत:च स्वत:ची केश-वेशभूषा (मेकअप) करतात. ते स्वत:ला मेकअप करूनच शिकतात. जीन्स टी-शर्ट, सलवार कमीज घालून आलेल्या या मुली जेव्हा मेकअप लावून, नऊवारी साडी, पायात घुंगरू घालून जेव्हा नाचायला उभ्या राहतात तेव्हा त्यांच्यात जे परिवर्तन झालेले असते ते ओळखण्यापलीकडले असते. नाजुकशा दिसणार्‍या या मुली पायात ५-६ किलोचे चाळ घालून तीन तास असल्या दणदणून नाचतात की आपण  आश्चर्यचकित होऊन जातो. 

गुलजार गुलछाडी किंवा पुणेरी ठसका बघताना माझ्या मनातील एक पूर्वग्रह गळून पडला तो म्हणजे लावणी अश्लील असते. या लावण्या शृंगारिक असतात, द्वयर्थी असतात, पण कुठेतरी मनात वाटू लागले की काय अश्लील आहे काय नाही हे कोण ठरवणार? आपणच ना! मग हळूहळू त्यातील अर्थ समजू लागून वाटू लागले की लावणी ही लोककला आहे तर ती समजून उमजून घेऊ. नंतर काही गाणी (उदा. कैरी पाडाची) खूप आवडू ही लागली. 

आकांक्षा कदम 
अनिल हंकारे 

लावणी, तमाशा या कलांबद्दल चित्रपटांतून, पुस्तक लेखांतून फार वाईट वाचलं, पाहिलं होते. सर्व कलाकार -विशेषत: स्त्री कलाकारांची पिळवणूक, शृंगारिक अर्थाची गाणी, थियेटर मालकांची मनमानी, गावाच्या मातबरांची, सावकार-जमीनदार व या स्त्रियांचे मालक (नवरा पण मालक हा शब्द वापरला जातो) यांकडून होणारे शोषण, समाजात मान्यता नसणं, या व्यवसायातील स्त्रियांना लग्न न करता येणं, या पार्श्वभूमीवर लावणी बघताना मनात असंख्य प्रश्न उभे राहिले. तेव्हा भूषणने मुंबईच्या कलाकारांशी गप्पा मारल्यावर लक्षात आलं की मुंबईचे कलाकार नोकरी-व्यवसाय-कॉलेज सांभाळून एक छंद, आवड म्हणून नाच करतात. या कलाकारांना त्यांच्या ग्रामीण भागातील सहकार्‍यासारखे समाजातून वाईट समजलं जात नाही. तसेच त्यांच्या घरच्यांना पण त्यांचा अभिमान वाटतो व लग्न करणे याबाबतही त्रास होत नाही. 

(क्रमश:)  

Coming Soon - पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सणसवाडी येथील अनुभव