Translate

Tuesday, October 30, 2012

Public Hearing : Jaitapur Nuclear Project



राष्ट्रीय चर्चासत्र : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प

१७-१९ सप्टेंबर २०११

सांस्कृतिक कलाकेंद्र, ग्रामपंचायत मिठगवाणे

जैतापूर लोकअदालत

संयोजक: Human Rights Law Network, जनहित सेवा समिती, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती (रत्नागिरी), रत्नागिरी जिल्हा जागृत संघ, जनहित सेवा समिती (पावस)

सहयोगी: चुटका परमाणू संघर्ष समिती, मंडाला (म.प्र),  Citizen for Alternative To Nuclear Energy (Karnataka), Jharkhand Organisation Against Radiation (Jharkhand), National Alliance of Anti-Nuclear Movements (Tamilnadu), National Alliance for People's Movements (Gujrat), परमाणू विरोधी मोर्चा, फतेह्बाद (हरयाणा), People's Movements Against Nuclear Energy (Tamilnadu), तारापूर परिसर विकास समिती (महाराष्ट्र), तारापूर परिसर विकास ट्रस्ट (महाराष्ट्र).

१७ सप्टेंबर २०११ 


आवाज-ए-निस्वातर्फे मी, रझिया, शबिना व हीना जैतापूरला गेलो. आयोजन HRLN (Human Rights Law Network)ने व इंडिया सेंटरने केलं होतं. आमच्याबरोबर बसमध्ये गुजरातचे कृष्णकांत व इतर शेतकरी-कार्यकर्ते होते. झारखंडचे आशिष, लच्छू, धानू, जस्मी व राणी हे तरुण कार्यकर्ते होते. तसेच TISS ची मुलं-मुली, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, मुंबईतील घर बचाव घर बनाव आंदोलन, मिली कौन्सिल व इतर वकील कार्यकर्ते होते.

१६ तारखेला मुंबईतून निघून १७ तारखेला पहाटे आम्ही आडिवरे गावात पोहोचलो. ताजेतवाने होऊन नाश्ता केल्यावर निघताना असे कळले की लोक-अदालातीच्या ठिकाणी उच्च न्यायालयाने जमावबंदीचा आदेश दिला आहे की ६० पेक्षा जास्त लोक या ठिकाणी असू नयेत. असल्यास न्यायालयाचा अवमान होईल व लोकांना अटक करण्यात येईल. आमच्या बसमध्येच ४७ जण होते व पुणे, मेघालय आणि इतर ठिकाणावरून आलेले कार्यकर्ते सामील झाले होते. हा विचार करता एक प्रकारची excitement वाटली. आम्ही म्हटले अटक झाली तरी चालेल आम्ही तिथे जाणारच!

मेघालायमधून केनेथ शडप, एअरमार्शल, आंध्र प्रदेशमधून चलपट्टी, पांडू राऊ, व पी. वरलक्ष्मी, ठाण्याहून वकील रवी जोशी, अहमदनगरहून जॉन पी. अब्राहम TISS चे हेमलता, नीरज, प्रणय इ. हे होते ज्यांनी आयोजनात मदत ही केली. केरळमधून रामचंद्र व सुब्रमण्यम यांनी कन्याकुमारीच्या कुडकल्पम अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी आंदोलनाची माहिती दिली.

साखरी नाटे बंदर गाव 

कच्चा रस्ता
लोक अदालतीच्या ठिकाणी जाताना नाटे गावाच्या पुलाच्या सुरुवातीला आमची बस बंद पडली. इथून मिठगवाणे १५-२० मिनिटांच्या अंतरावर होते. या पुलावरून आम्ही तिकडच्या निसर्ग सौंदर्याचे, साखरीनाटे बंदरगावाचे, नदीतल्या मच्छिमारांचे काम करताना, किनार्‍यावरील होड्यांचे फोटो काढले. नंतर आयोजकांनी त्यांच्या खाजगी गाड्या पाठवून आमची सुटका केली, तरी एका रस्त्याचा भाग इतक्या वाईट अवस्थेत, खड्डे व चिखलाने भरलेला होता की हा रस्ता आम्हाला चालत पार करावा लागला.

ही जनसुनावणी मिठगवाणेच्या सांस्कृतिक कलाकेंद्रात होती. तिथे पोहोचल्यावर आयोजकांनी सांगितले की फक्त ६० जण सभागृहात बसू शकतात आणि बाकीचे अंजनेश्वर मंदिरात छोटी चर्चासत्रे होती त्यात बसू शकतात. आमच्या टीम मधून मी व रझियाने नोटस काढल्या व हीना, शबिनाने फोटो काढले.

Panellists

या जनसुनावणीला काही माजी न्यायमूर्ती येणार होते पण ते येऊ न शकल्याने त्यांऐवजी पर्यावरण मंत्रालयाचे माजी सचिव जे. सी. काला, शास्त्रज्ञ सुधीर परांजपे व ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका शांता रानडे उपस्थित होत्या.





प्रवीण गवाणकर (जनहित सेवा समिती)
सुब्रमण्यम व माडबनच्या जनहित सेवा समितीच्या प्रवीण गवाणकरांनी चर्चेला सुरुवात केली.

उल्का महाजनांनी सांगितले - सहा राज्यांतून सहकारी कार्यकर्ते आलेले आहेत. जैतापूर व आसपासच्या परिसरात ३०७ कलम सतत लागू असते. (स्थानिक कार्यकर्त्यांनी याचा सतत उल्लेख केला.) या लोकशाहीत परवानगी घेऊनच सभा घेता येते. या तळकोकणात भरपूर प्रकल्प आहेत पण या अणु ऊर्जा प्रकल्पाचा उपयोग शहरातल्या बड्या धेंडांच्या चैनीकरता होईल. इथे नीट चालायला सडका नाहीत पण शहरांत मॉलमधील २४ तास चालणार्‍या सरकत्या जिन्याकरता ही ऊर्जा वापरली जाणार आहे.

उल्का महाजन 
उल्का महाजनांनी रायगड जिल्ह्यातील स्पेशल इकोनॉमिक झोन (SEZ) विरोधात शेतकर्‍यांच्या जमिनीकरता काम केलेले आहे. त्या म्हणाल्या की जमीन संपादनच नाही तर सगळ्या कारणांकरता विरोध केला पाहिजे. कारण पहिला बळी शेतकरी, दुसरा कामगार, यानंतर नागरिक आणि नंतर लघु-मध्यम उद्योजक हे आहेत. बड्या उद्योजकांना मोकळे रान मिळत आहे. National Manufacturing and Investment Zone ज्यात अनेक किलोमीटरच्या पट्ट्यात अनेक सेझ असतील. २५% सेझ ची जागा उद्योगांकरता वापरली जाईल व बाकीची ७५% त्यांच्या पंचतारांकित सुविधा व वसाहतींकरता वापरली जाईल. 


त्यानंतर जैतापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी, माडबनचे सरपंच भिकाजी वाघधरे, शिवसेनेचे विभागप्रमुख अजित नारकर यांनी भाषणे केली. 
अजित नारकर म्हणाले - जपानच्या अणुभट्टीत स्फोट झाल्यानंतर जैतापूरच्या मच्छिमार, फळ बागायतदार व शेतकर्‍यांच्या असे लक्षात आले की इथे स्फोट झाल्यावर काय काय घडू शकते. पुढच्या पिढ्यांवर अणुस्फोटांचे काय परिणाम होतात. स्फोट झाल्यावर कित्येक वर्षे ती जमीन नापीक होते. सरकारकडून धाक-दडपशाही चालू आहे. स्थानिकांना यामुळे हृदयविकार चालू होऊन काहींचे मृत्यू पण झालेले आहेत.

डॉ. विवेक मोंटेरोनी भारनियमनाबद्दल माहिती दिली व म्हटले की जर शहरे आणि गावे या दोन्ही ठिकाणी भारनियमन केले तर सर्वांना समान ऊर्जा मिळेल.

यावेळी मी मेघालायातून आलेले कार्यकर्ते केनेथ व एअरमार्शल यांकरता मराठी व हिंदीतील भाषणे भाषांतरित करत होते म्हणून पुढील काही भाषणे लिहून घेऊ शकले नाही. बोलणे ऐकून ताबडतोब भाषांतर करणे असे मी पहिल्यांदाच केले, त्यामुळे मला सगळे लक्षपूर्वक ऐकावे लागले. आणि दुपारच्या जेवणानंतर असल्याने मला खूप झोप येत होती तरीसुद्धा मी नेटाने करीत होते. काही वेळाने माझ्या असे लक्षात आले की केनेथनी पण डोळे मिटून घेतले आहेत. मग केनेथ मला म्हणाले की त्यांचा रात्रीचा ट्रेनचा प्रवास होता व त्यांना नीट झोप लागली नाही. मी पण म्हटले की मी सुद्धा रात्रभर बसने प्रवास केला आणि मलापण नीट झोप लागली नाही. मग मी भाषांतर करायचे प्रयत्न सोडून दिले व आरामात बसलो.

त्यानंतर आलेल्या वक्त्याचे नाव कळले नाही. त्यांनी सांगितले की सरकारचा सौरउर्जेच्या विकासावरील खर्च कमी होत आहे व अणूऊर्जेवरील दुपटीने वाढत आहे. त्यांनी सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं. ते म्हणाले - जपानला अणूऊर्जा किती धोकादायक आहे हे दोन प्रकारे कळलं आहे. पहिलं म्हणजे हिरोशिमा व नागासाकी वरील हल्ल्यांमुळे आणि आता फुकुशिमा येथील अणुभट्टी अपघातामुळे हि उर्जा सुरक्षित आणि भरवशाची नाही हे कळले आहे.

गुजरात मधून आलेले कार्यकर्ते. (NAPM)
गुजरातमधील मिठी विर्डी येथील कृष्णकांत व इतर जे शेतकरी स्त्री-पुरुष आले होते त्यांनी आपल्या आंदोलनाची माहिती दिली. त्यांच्या सुपीक जमिनी अणुभट्टीकरता देण्यास त्यांचा विरोध आहे. त्यांची घोषणा आहे - "जान देंगे लेकीन जमीन नही देंगे." मिठी विर्डी येथे जमीन परीक्षणासाठी आलेल्या सरकारी नोकरांना येथील सर्व जनतेने विरोध करून त्यांना गावात येऊ दिलं नाही व अजूनही येऊ दिलं जात नाही. त्यांनी सांगितले की गुजरात सरकार त्यांच्या वेबसाईटवर म्हणतं की गुजरातमध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक होते व  employment rate  व growth rate चांगला आहे. पण प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे व खूप बेकारी आहे. तसेच  सरदार धरणाबद्दलही विजयी स्वरात म्हटलं आहे की त्यामुळे 'प्यासा गुजरात'ची तहान भागली आहे. पण सत्य असे आहे की जिथे पाणी पोहोचलं आहे तिथे फक्त औद्योगिक विकास झाला आहे. पण शेतकरी आणि नागरिक ज्यांना खरी गरज आहे ते तहानलेलेच आहेत.
मिठी विर्डीतल्या स्त्री शेतकरी म्हणाल्या की त्यांच्या जमिनीत फळे, भाज्या व धान्य होते व कोणत्या कारखान्यात त्याची निर्मिती होईल? त्यामुळे त्यांनी म्हटलं असा विकास का व कोणाकरता? तसेच त्यांनी तारापूर येथील अणूकेंद्राला भेट दिली तेव्हा तेथील स्थानिकांनी त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला व आपल्या जमिनी कधीही देऊ नका हे सांगितले.

Monday, October 29, 2012

Pune's Lavani

पुण्याची लावणी.

आर्यभूषण थिएटर, पुणे

सकाळच्या गाडीनं मी व भूषण पुण्याला गेलो. वैशाली या हॉटेलमध्ये भरपेट खाऊन नंतर ११च्या सुमाराला गणेश पेठ, डुल्या मारुती चौक येथील आर्यभूषण थिएटरमध्ये गेलो. हे थिएटर पुण्यातील जुन्या वस्तीत आहे. त्यामुळे पुणे स्टेशन ते आर्यभूषण थिएटर इतक्या निरनिराळ्या वस्त्यांतील बदल कळले. आर्यभूषणमध्ये शिरल्या शिरल्या लक्षात आले की तिथली जमीन ओली आहे. स्त्री-पुरुष कलाकार उघड्यावरच  अंघोळी आणि कपडे-भांडी धुणी करत होते.

पद्माबाई 

पद्माबाई, ज्येष्ठ तबलजी व त्यांच्या पार्टीतील तबलजी. पुणे २००९.
आर्यभूषणमध्ये आम्ही प्रथम पद्माबाईंकडे गेलो. तेव्हा त्यांची रिहर्सल चालू होती. पद्माबाई व त्यांच्या ग्रुपमधील एक डान्सर यांची त्यांच्या ग्रुपचा ढोलकिया आणि तबलजी यांजबरोबर ही रिहर्सल होती. याशिवाय एक ज्येष्ठ तबलजी बसले होते. त्यांनी पद्माबाईंना गाण्याचे व तबल्याचे बोल लिहून दिले. या आधी मी ज्या लावण्या बघितल्या होत्या त्यांच्या घुंगरांच्या तालात मला काही फरक जाणवला नव्हता किंवा गाण्यामध्ये आणि ढोलकीच्या तालातही काही फरक जाणवला नव्हता. पण पद्माबाईंकडे आलेल्या त्या ज्येष्ठ तबलजींनी (त्यांचे नाव लक्षात नाही) इतर डान्सर्सना शिकवताना मला सुद्धा घुंगरांचे ताल आणि तबल्याचे बोल यांतील ताळमेळ समजून आला. 


पुण्याला जायची माझी पहिलीच वेळ असल्याने मला काही या मुलींशी बोलणे जमले नाही व भूषणच सगळ्यांची बोलत राहिला. गावाकडच्या असल्याने सगळ्या डान्सर्स एकदम अगत्यशील व आग्रही आहेत. प्रत्येक घरात गेलं की नको नको म्हटलं तरी एक चहा, एक ज्यूस प्यावाच लागतो. पहिल्यांदा मी नको म्हणायचे मग लक्षात आले की  इथे जेवण उशिरा २-२:३० वाजता होतं त्यामुळे फोटोग्राफी-गप्पा करता करता हे प्यायला काही वाटत नाही.


मोहनाबाईं कडील जेवण, पुणे २०१०.
पद्माबाईंकडील मुलींचे वय जाणून घेतल्यावर मला धक्काच बसला. कारण १२-१३ वर्षांपासून मुली यायला लागतात. याचे कारण कोणत्या जातीत जन्म घेतला किंवा खूप गरिबी. पद्माबाईंकडील व लावणीतील एक लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे त्यांचे कडील जेवण. माझे पोट खूप नाजूक होतं. तिखट, नॉनव्हेज आणि बाहेरचं जेवण मला कधीही पचत नसे. त्यामुळे मी हे पहिले जेवण घाबरतच घेतले. कसलीतरी पालेभाजी आणि सुंदर मोठ्या चपात्या. त्या भाजीत खूप हिरव्या मिरच्या होत्या. माझ्या घरी हिरव्या भाजीत हिरव्या मिरच्या टाकत नाहीत. जेवण संपल्यावर माझ्या ताटात आधीच्या भाजीच्या ढिगाहून थोडा कमी असा हिरव्या मिरच्यांचा ढीग माझ्या ताटात जमा झाला होता. मी सोडून कोणाच्याही ताटात तो नव्हता. हे जेवण आणि नंतर मोहनाबाईंकडील बाकीची जेवणं खाऊन कळले की जेवण कितीही तिखट असले तरी पोट ही बिघडत नाही व acidity पण होत नाही. जेवण पण मस्त झणझणीत मटणाचे, वगैरे असतं.


पद्माबाई पोझमध्ये, पुणे २०१०
 पद्माबाई, मोहनाबाई व इतर पार्ट्याच्या आर्यभूषणमधील खोल्यांतून फिरताना काही गोष्टी लक्षात येतात त्या म्हणजे छोट्या जागा नि अंधार! फोटोग्राफरच्या दृष्टीकोनातून बघता खूपच अंधार. थिएटर जुन्या पद्धतीचे असल्याने खिडक्या नाहीत. मधोमध स्टेज समोर बाकडी व आजूबाजूला छोट्या खोल्या. जो काही प्रकाश असेल तो दारातून आणि ट्यूबलाईट्समधून मिळतो. ट्यूबलाईट्स दिवसभर चालू ठेवाव्या लागतात.
कोणत्याही खोलीला खिडक्या नाहीत. ज्या खोल्या अंतर्भागात आहेत त्यांना तर दरवाजातून सुद्धा उजेड मिळत नाही. विसेक पार्ट्या तिथे राहतात. खोल्या छोट्या असल्याने काही जणी स्टेजवर झोपतात. मुलींना थिएटरवरच रहावे लागते. महिन्यातून एकदा घरी किंवा बाहेर जाता येतं.


पद्माबाई पोझमध्ये, पुणे २०१०

पद्माबाई पोझमध्ये, पुणे २००९

पद्माबाई पोझमध्ये, पुणे २००९


फोटो नाचाचे काढायचे असल्याने स्लो शटर स्पीड, ट्रायपॉडचा उपयोग नाही आणि तो ठेवायला जागा सुद्धा नाही. मला flash वापरायला आवडत नसूनही ISO वाढवल्याने फोटोची quality खराब होत असल्याने काही वेळा पद्माबाईंकडे  flash चा वापर करायला लागला. मला तेव्हा अंधार्‍या ठिकाणी फोटो कसे काढावे हे माहित नव्हतं व माझ्याकडे low-light लेन्स पण नव्हती. पद्माबाईंचे वय ४५च्या पुढे आहे. त्या इतक्या जोमाने आणि उत्साहाने नाचतात कि आपल्याला थक्क व्हायला होते. सतत हसतमुख असतात.



Thursday, March 10, 2011

Lavani Photography - My Experiences

लावणी

लहानपणी चित्रपटांत लावणी तमाशा सवालजवाब पाहिले होते. चित्रपटातील इतर गोष्टींप्रमाणेच ह्या गोष्टी देखील माझ्या शहरी वातावरणाला अप्राप्य होत्या. पण कुठेतरी मनात अशी इच्छा होती की तमाशा बघायला मिळावा. पुढे मोठेपणी एका ग्रामीण भागात वाढलेल्या मैत्रिणीशी ओळख झाल्यावर मी तिला याबद्दल विचारले. तिचे म्हणणे असे पडले की - गावातल्या तमाशांना स्त्रिया जात नाहीत, फक्त पुरुषच असतात. तेव्हा वाटले की तमाशा आपल्याला काही बघायला मिळायचा नाही.

काही वर्षांनी भूषण या माझ्या मित्राबरोबर - बिन बायकांचा तमाशा - हा लावणी नृत्याचा कार्यक्रम विलेपार्ले इथल्या दीनानाथ सभागृहात बघितला. त्या कार्यक्रमाला आलेला प्रेक्षकवर्ग मुख्यत्वे कामगारवर्ग होता आणि मला वाटल्याप्रमाणे फक्त पुरुष नसून पूर्ण कुटुंब - मुले, आई, आजी, मावशी असा सर्वसमावेशक होता. बिन बायकांचा तमाशा हा कार्यक्रम हा नावाप्रमाणेच अगदीच वेगळा होता. ह्या कार्यक्रमातील सर्व नृत्यांगना ह्या स्त्रिया नसून पुरुष कलाकार आहेत. त्या स्त्रिया नाहीत हे ओळखू ही येत नाही इतक्या त्या नृत्यात प्रविण आहेत . त्या कार्यक्रमाचा अनुभव फारसा सुखद नव्हता. भड़क प्रकाश योजना, कर्कश गाणी आणि प्रेक्षकांतून शिट्ट्या, आरोळ्या असे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर लावणी सभ्य स्त्रियांसाठी नाही हे किती खरे असे मला वाटले.

'नटले तुमच्यासाठी' या डॉक्युमेंटरीकरता छायाचित्रण

मुजरा

या नंतर लगेचच भूषणने  मला फोन केला आणि त्याने मला सांगितले की तो लावणीवर संशोधन आणि माहितीपट (डॉक्युमेंटरी) करतो आहे तर त्याला still photography करून हवी आहे. मी तेव्हा नुकतीच फोटोग्राफी करायला सुरुवात केली होती. त्यामुळे जेव्हा मी 'गुलजार गुलछडी' या लावणी कार्यक्रमाचे फोटो काढण्यास गेले तेव्हा स्टेजवर नाच चालू आहे, आपण प्रेक्षागृहात दुसर्‍या रांगेत इतर प्रेक्षकांसमवेत बसून फोटो काढतोय असे केले नव्हते. पण नैसर्गिक प्रकाशात फोटो काढायची आवड आणि सवय होती. दामोदर हॉल परळ येथे गेल्यावर प्रथम ड्रेसिंगरूममधे जाऊन सर्व कलाकारांच्या ओळखी करून घेतल्या. ड्रेसिंगरूममधे आरशांना दिवे लावले असल्यामुळे कमी प्रकाशात फोटो काढणे सोपे गेले. तरीसुद्धा आरशांनी भरलेल्या खोलीत स्वत:चा फोटो येऊ न देता कलाकारांचे फोटो कसे काढायचे हे स्वत:च शिकायला मिळाले. माझी किट लेन्स (18-55mm) ही जवळून फोटो काढायला असमर्थ होती. तेव्हा अंधारात लेन्स बदलणे, सुरुवातीचे फोटो वाइड अँगलने काढून नंतरची नृत्ये, हावभाव, अदाकारी इत्यादि टेलीफोटो लेन्सने काढणे याचा सराव झाला. रंगमंचावर प्रकाश योजना बदलत असते, स्पॉटलाईटची तीव्रता कमी-जास्त होत असते. लावणी कलाकारांच्या चेहर्‍यावरील प्रकाशही कमीजास्त होतो अशा वेळेला न हललेले फोटो काढणे ही एक कसरतच असते.

माझा कॅमेरा आणि लेन्सेस बजेटमधल्या असल्यामुळे त्यांची कमी प्रकाशात जलदगतीचे फोटो काढायची क्षमता नाही आणि थिएटरमधे कमी प्रकाशातील नृत्यांचे फोटो काढताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.  स्टेजवरील नृत्यांचे फोटो काढता येण्यासाठी ISO वाढवून 800, 1600 करावे लागते. पण असे केल्यास फोटोमध्ये noise वाढून ते खराब दिसण्याची शक्यता वाढते. तसेच दुसर्‍या रांगेत बसूनही वाइड लेन्सने फोटो काढणे शक्य नसते. पण ग्रुप फोटो नीट येतात. टेलिलेन्सने फोटो काढताना Tripodशिवाय काढले कारण तिथे Tripod वापरणे शक्य नव्हते. कधी ड्रेसिंग रूम, कधी विंगेतून, कधी समोर बसून असे फोटो काढले.  
टेलिलेन्सने slow shutterspeed वापरून काढलेले सुरुवातीचे फोटो हलले, पण त्याच ३ तासाच्या शोमध्ये सराव होऊन न हललेले क्लोजप फोटो काढता आले. 

पुणेरी ठसका मुंबईचा हिसका मधील कलाकार 

बॅकस्टेजला शोच्या सुरुवातीला, मध्यंतरात जाण्याने खूप गंमतीदार प्रसंग आले. कुठल्या पेपर करता फोटो काढता हि विचारणा तर सतत होत असते. एका निर्मात्याने मलाच फिल्म दिग्दर्शिका समजून त्यांच्या डान्स पार्टीला फिल्ममध्ये घ्यायची विनंती केली. फोटो काढता काढता इतर कलाकारांबरोबर प्यायलेला कटिंग चहा आणि खाल्लेला वडापाव, माझ्या लाजाळूपणा व अबोलतेवर मात करून मारलेल्या गप्पा. तरीही हे पहिले प्रयत्न मला जमले नाहीत आणि नीटसे फोटोही आले नाहीत. पण जे काही आले ते वेगळेच आले आणि सर्व मित्र मैत्रिणींनी खूप कौतुक केलं.

सिनेस्टार प्रज्ञा जाधव

दुसरा लावणी कार्यक्रम 'पुणेरी ठसका मुंबईचा हिसका' दोनच दिवसांनी दामोदर हॉलमध्येच होता. आणि आता या वातावरणाची सवय झाली होती. दुसर्‍या शोच्या वेळेला डॉक्युमेंटरी चित्रित होणार होती. तेव्हा त्या कॅमेर्‍यामध्ये स्वत:ला येऊ न देता फोटो काढायचे होते. या शोमध्ये आकांक्षा कदम, अनिल हंकारे असे लावणी मधील दिग्गज कलाकार होते. हे सर्व लावणी कलाकार स्वत:च स्वत:ची केश-वेशभूषा (मेकअप) करतात. ते स्वत:ला मेकअप करूनच शिकतात. जीन्स टी-शर्ट, सलवार कमीज घालून आलेल्या या मुली जेव्हा मेकअप लावून, नऊवारी साडी, पायात घुंगरू घालून जेव्हा नाचायला उभ्या राहतात तेव्हा त्यांच्यात जे परिवर्तन झालेले असते ते ओळखण्यापलीकडले असते. नाजुकशा दिसणार्‍या या मुली पायात ५-६ किलोचे चाळ घालून तीन तास असल्या दणदणून नाचतात की आपण  आश्चर्यचकित होऊन जातो. 

गुलजार गुलछाडी किंवा पुणेरी ठसका बघताना माझ्या मनातील एक पूर्वग्रह गळून पडला तो म्हणजे लावणी अश्लील असते. या लावण्या शृंगारिक असतात, द्वयर्थी असतात, पण कुठेतरी मनात वाटू लागले की काय अश्लील आहे काय नाही हे कोण ठरवणार? आपणच ना! मग हळूहळू त्यातील अर्थ समजू लागून वाटू लागले की लावणी ही लोककला आहे तर ती समजून उमजून घेऊ. नंतर काही गाणी (उदा. कैरी पाडाची) खूप आवडू ही लागली. 

आकांक्षा कदम 
अनिल हंकारे 

लावणी, तमाशा या कलांबद्दल चित्रपटांतून, पुस्तक लेखांतून फार वाईट वाचलं, पाहिलं होते. सर्व कलाकार -विशेषत: स्त्री कलाकारांची पिळवणूक, शृंगारिक अर्थाची गाणी, थियेटर मालकांची मनमानी, गावाच्या मातबरांची, सावकार-जमीनदार व या स्त्रियांचे मालक (नवरा पण मालक हा शब्द वापरला जातो) यांकडून होणारे शोषण, समाजात मान्यता नसणं, या व्यवसायातील स्त्रियांना लग्न न करता येणं, या पार्श्वभूमीवर लावणी बघताना मनात असंख्य प्रश्न उभे राहिले. तेव्हा भूषणने मुंबईच्या कलाकारांशी गप्पा मारल्यावर लक्षात आलं की मुंबईचे कलाकार नोकरी-व्यवसाय-कॉलेज सांभाळून एक छंद, आवड म्हणून नाच करतात. या कलाकारांना त्यांच्या ग्रामीण भागातील सहकार्‍यासारखे समाजातून वाईट समजलं जात नाही. तसेच त्यांच्या घरच्यांना पण त्यांचा अभिमान वाटतो व लग्न करणे याबाबतही त्रास होत नाही. 

(क्रमश:)  

Coming Soon - पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सणसवाडी येथील अनुभव 

Sunday, August 26, 2007

रंग आणि बदललेले संदर्भ

कुणीतरी म्हटले,
भगवा रंग पवित्र,
मला तर तो हिंसेचा वाटतो.

पण आंब्याचा रंग वेगळा,
तो हवाहवासा.

लाल रंग रक्ताचा? म्हणूनच का हिंसेचा?
मला दिसते लाल निशाण.. कामगारांच्या एकजुटीचा.

निळा रंग अजून आकाशाचा ..
आकाशच जरी ग्रे वाटले तरी.
अन् हिरवागार निसर्गाचा..

या सगळ्या रंगांचा एकत्र पट्टा,
इंद्रधनुष्याचा..

सात रंगांनी एकत्र झालेला,
आशेचा.. मायेचा..
अशक्य वाटणार्‍या भविष्याचा.